रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील खेडशी नाका येथील ८५ वर्षीय श्रीमती विमल शंकर पेडणेकर यांचे आज, गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे मरणोत्तर देहदान करण्यात आले. हे या संस्थेतील सातवे देहदान ठरले असून, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
श्रीमती विमल शंकर पेडणेकर यांचे काल, बुधवार दिनांक २५ जून २०२५ रोजी वृद्धापकाळाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथील अतिदक्षता विभागात निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या श्रीमती माधवी मधुकर नाखरेकर यांनी एक अत्यंत स्तुत्य निर्णय घेत, आपल्या मातोश्रींच्या देहाचा उपयोग वैद्यकीय विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी आणि संशोधनासाठी व्हावा या उदात्त हेतूने देहदानाचा संकल्प केला.
या देहदान प्रक्रियेवेळी श्रीमती विमल पेडणेकर यांची नात सौ. मंजिरी नाखरेकर, नातजावई आणि सुहास पालेकर, सागर भिंगारे तसेच शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक श्री. रेशम जाधव, तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, मिथिलेश मुरकर आणि मिहिर लोंढे यांनी या संपूर्ण देहदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
श्रीमती विमल शंकर पेडणेकर यांच्या या मरणोत्तर देहदानामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीराचे सखोल ज्ञान मिळण्यास मदत होईल आणि भविष्यातील वैद्यकीय संशोधनासाठीही याचा उपयोग होईल, अशी अपेक्षा आहे. देहदानाच्या या उदात्त कार्यातून पेडणेकर कुटुंबीयांनी समाजात एक आदर्श घालून दिला आहे.