चिपळूण: चिपळूण तालुक्यात पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी, नुकत्याच झालेल्या पावसामुळे रेहेळ-भागाडी येथील संदेश बाबू ताणकर यांच्या गुरांचा गोठा कोसळून मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, मोठी हानी टळली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चिपळूण तालुक्यात विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. अधूनमधून किरकोळ सरी कोसळत असल्या तरी, पावसाचा जोर कमी झाला आहे. रविवारी तालुक्यात १४.६७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यासोबतच, आतापर्यंत एकूण ६२१.१२ मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य नियंत्रण कक्षातून मिळाली आहे.
गोठा कोसळल्याने ताणकर कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीची दखल घेऊन त्यांना योग्य ती मदत करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.