GRAMIN SEARCH BANNER

आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात ‘सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी व वर्तमान संदर्भ’ या विषयावर व्याख्यान संपन्न

Gramin Varta
80 Views

देवरुख: भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री स्व. वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ‘सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी व वर्तमान संदर्भ’ या विषयावर विद्यार्थ्यांना प्रा. धनंजय दळवी यांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानाची सुरुवात एन. एस. एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे यांनी आपल्या प्रास्ताविकाने केली. आपल्या प्रास्ताविकात प्रा. सौ. कोरे यांनी व्याख्यानाचा उद्देश व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.

प्रा. धनंजय दळवी यांनी लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून  केलेल्या बहुमोल व अभ्यासपूर्ण कार्याचा सविस्तर आढावा घेतला. देशातील प्रमुख राजकारणी तसेच, भारताचे उपपंतप्रधान व गृहमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय  आजच्या परिस्थितीमध्ये कसे  महत्त्वपूर्ण आहेत, हे विविध उदाहरणासह पटवून दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात भारताच्या राजकीय एकसंघीकरणासाठी ५६५ अर्धस्वायत्त संस्थांचे  शांतता व सलोख्यासाठी केलेले विलीनीकरण भारताच्या एकात्मता व एकजुटीच्या दृष्टीने कसे योग्य होते, याबाबत सविस्तर माहिती दिली. 

सरदार वल्लभभाई पटेल यांचे वकिली पेशातील कार्य, भारत छोडो आंदोलनातील त्यांचे योगदान, पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांसाठी घेतलेले तत्कालीन निर्णय याबाबतही आढावा घेतला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा असणारा प्रभाव आणि अनेक प्रसंगात घेतलेले धीरोदत्त निर्णय यातून त्यांची विविध प्रसंगी अनुभवण्यास मिळालेली कणखरता, उत्तम निर्णय क्षमता व तडफदारपणा याबाबतची उदाहरणे प्रा. दळवी यांनी याप्रसंगी दिली. वल्लभभाई पटेल यांना जनतेने दिलेल्या सरदार या उपाधीबाबतची माहिती देऊन मार्गदर्शनाची सांगता केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. स्वप्नाली झेपले यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थ्यांसह प्रा. विजय मुंडेकर, प्रा. मयुरेश राणे, प्रा. वसंत तावडे आणि प्रा. शिवराज कांबळे उपस्थित होते.

Total Visitor Counter

2647286
Share This Article