नायरीचा झैद पाटणकर इंग्लंड दौऱ्यावर; मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संघात मानाचे स्थान

Gramin Varta
409 Views

संगमेश्वर : तालुक्यातील नायरी गावचा सुपुत्र आणि उदयोन्मुख वेगवान गोलंदाज झैद नफील पाटणकर याची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) प्रेसिडेंट्स इलेव्हन संघात निवड करण्यात आली आहे. या संघात स्थान मिळवलेला झैद आता इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला असून, त्याच्या या गौरवशाली कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

२० जून ते १५ जुलै २०२६ या कालावधीत होणाऱ्या या महत्त्वाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने १८ खेळाडूंची निवड केली आहे. या दौऱ्याचा मुख्य उद्देश युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्ट्या, आव्हानात्मक हवामान आणि उच्चस्तरीय स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव मिळवून देणे हा आहे. या दौऱ्यात एमसीए प्रेसिडेंट्स इलेव्हन संघ इंग्लंडमधील विविध काउंटी संघांविरुद्ध एकदिवसीय आणि दोन दिवसीय सामने खेळणार आहे.

झैद पाटणकरने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर मुंबई क्रिकेट वर्तुळात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याआधी त्याने मुंबईच्या १६ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील संघातून खेळताना आपल्या अचूक मारक गोलंदाजीची चुणूक दाखवली आहे. मुशीर खान, अभीग्यान कुंडू, मोहित अवस्थी आणि अथर्व अंकोलेकर यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंसोबत झैदला या संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि क्रिकेटमधील समर्पणाचे हे फळ असल्याचे बोलले जात आहे.

झैदच्या या निवडीबद्दल नायरीसह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे. क्रीडाप्रेमी, नागरिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन होत असून, भविष्यात तो मुंबई संघ, आयपीएल आणि भारतीय संघात स्थान मिळवून राज्याचे नाव उज्ज्वल करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळाल्यास जागतिक स्तरावर कशा प्रकारे चमकता येते, याचे झैद हे एक उत्तम उदाहरण ठरला आहे.

- Advertisement -

Total Visitors :
4828082
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *