GRAMIN SEARCH BANNER

मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील गॅबीयन वॉलच्या रचनेत होणार बदल

चिपळूण: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटातील धोकादायक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या गॅबीयन वॉलचे काम पावसामुळे थांबविण्यात आले आहे. आता पावसाळ्यानंतरच या कामाला सुरवात केली जाणार आहे.

त्यासाठी या गॅबीयन वॉलच्या रचनेत काही बदल करण्याचे प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केले जात आहेत. त्याबाबतचे नियोजन आतापासूनच सुरू आहे. एकीकडे गॅबीयन वॉलचे काम थांबले असले तरी दुसरीकडे लोखंडी जाळी बसवण्याचे काम मात्र अंतिम टप्प्यात आले आहे.

परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम मार्गी लागल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात धोकादायक ठिकाणी संरक्षक लोखंडी जाळ्या आणि उताराच्या बाजूस गॅबीयन वॉल उभारण्यात येत आहे. गत पावसाळ्यात येथील गॅबीयन वॉल कोसळली होती. यावर्षी पहिल्याच पावसात गॅबीयन वॉल ढासळण्याचा प्रकार घडला. यामुळे पायथ्यालगत असलेल्या वस्तीला धोका निर्माण झाल्याने तातडीने हे काम थांबवण्यात आले. त्याशिवाय गॅबीयन वॉल कोसळू नये, तसेच तेथून पाण्यासोबत माती वाहू जाऊ नये, यासाठी तेथे प्लास्टीक टाकण्यात आले. मात्र तरिही तेथील माती पाण्यासोबत लोकवस्तीत येत आहे. पेढे येथील लोकवस्तीत व शेतात चिखल साचल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीकडून ग्रामस्थांच्या शेतात व घर परिसरात साचलेला चिखल हा जेसीबीच्या साह्याने काढण्यात आला. पावसाळ्या पुर्वीच गॅबीयन वॉलचे काम मार्गी लागण्याची आवश्यकता होती. मात्र हे काम मार्गी न लागल्याने ग्रामस्थांची चिंता अजूनही कायम आहे. यापुर्वी परशुराम घाटात डोंगर कटाई करताना घाटातील भले मोठे दगड लोकवस्तीत येऊन घराला तडे गेले होते. तर २०२१ च्या अतिवृष्टीत घाटातील दरड खाली येऊन एक घर उद्वस्थ झाले, अन त्यात दोघांना जीव गमवावा लागला होता.

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाने खरबदारीची उपाययोजना म्हणून गॅबीयन वॉलचे काम तातडीने थांबवले आहे. पावसाळा संपेपर्यत या कामावर केवळ देखरेख ठेवली जाणार आहे. पावसाळ्यानंतर गॅबीयन वॉलच्या रचनेत तांत्रिकदृष्ट्या काही बदल प्रस्तावीत केले जात आहेत. या नविन रचनेनुसार गॅबीयन वॉलचे काम केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग, महाड विभागाचे शाखा अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.

Total Visitor Counter

2474913
Share This Article