GRAMIN SEARCH BANNER

लोकसहभागातून साडेतीन एकर जागेत देवराई प्रकल्प!

Gramin Varta
107 Views

कलाकारांनी केले प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या उपक्रमाचे कौतुक

चिपळूण : प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणजवळील कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या साडेतीन एकर पडीक जमिनीत सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, लोकसहभाग आणि सीएसआर फंडातून देवराई उभारणी सुरू झाली आहे. या उपक्रमाचे निरीक्षण करण्यासाठी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सोमवारी चतुरंग प्रतिष्ठानच्या पुढाकाराने पार पडलेल्या “गोष्ट संयुक्त संगीत मानापमानाची” या नाटकातील कलाकारांनीही देवराईचे अवलोकन केले. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी कलाकारांना उपक्रमाबाबत माहिती दिली. या वेळी कास्टिंग डिरेक्टर निरंजन जावीर, आशिष वझे आणि आशिष नेवाळकर आदी उपस्थित होते. कलाकारांनी या पर्यावरणीय उपक्रमाचे कौतुक केले.

कळंबस्ते येथील साडेतीन एकर पडीक जागेत उभारल्या जाणाऱ्या देवराईत २००हून अधिक देशी प्रजातीची झाडे लावली जाणार आहेत. पावसाळा सुरू होताच रोपांची लागवड केली जाईल. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून विविध खासगी कंपन्या, सामाजिक संस्थां, मंडळे आणि दानशूरांचा सहभाग मिळत आहे.

जागा अनेक वर्षे पडीक होती आणि रेल्वे फाटक येथील मुख्य रस्त्यालगत असल्याने देवराईसाठी योग्य ठरली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मान्यता दिली आहे. गेल्या चार-पाच दिवसात जागेचे सपाटीकरण करण्यात आले असून झाडांच्या सुरक्षिततेसाठी चारही बाजूंना तारेचे कंपाऊंड बसवले गेले आहे. झाडांमध्ये  आवश्यक अंतर ठेवून नियोजनबद्ध लागवड केली जाईल. झाडांना नियमित पाणी मिळण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पर्यावरण प्रेमी भाऊ काटदरे, तहसीलदार प्रविण लोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, महसूल व वनविभागाचे अधिकारी, पंचायत समिती, लोटे एमआयडीसीतील कंपन्या, क्रिडाई आणि विविध सेवाभावी संस्था व शासकीय कार्यालये यांचा या प्रकल्पात लोकसहभाग आहे. झाडांची माहिती देणारे फलक आणि त्याचा क्युआर कोड झाडांच्या मध्यभागी लावण्यात येणार आहे, ज्यामुळे मुलांना विविध झाडांची माहिती सहज मिळू शकेल.

उपक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संस्था असा विश्वास व्यक्त करत आहेत की ही हिरवीगार देवराई चिपळूण परिसराच्या पर्यावरणीय आणि नैसर्गिक वैभवात भर टाकेल आणि भविष्यातही बहरत राहील, असा विश्वास यावेळी  कास्टिंग डिरेक्टर निरंजन जावीर यांनी व्यक्त केला.

Total Visitor Counter

3073114
Share This Article