रत्नागिरी: तालुक्यातील मौजे मिरजोळे, लक्ष्मीकांत वाडी येथे आज सकाळी एका मादी बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात वन विभागाला यश आले आहे. येथील कोलगे किराणा दुकानाजवळ असलेल्या लाकडाच्या माचाखाली लावलेल्या जाळीत हा बिबट्या अडकल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या घटनेची अधिक माहिती अशी की, आज दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सागर शिवाजी कळंबटे आणि गावचे माजी सरपंच गजानन गुरव यांना लाकडाच्या माचाखालील जाळीत बिबट्या अडकल्याचे दिसून आले. त्यांनी या घटनेची तत्काळ माहिती दूरध्वनीद्वारे पाली येथील वनपाल यांना दिली. माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांच्यासह वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती, मात्र वन कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांना सुरक्षित अंतरावर हटवले आणि बचाव कार्याला सुरुवात केली.
विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने जाळीत अडकलेल्या या बिबट्याला अतिशय सावधगिरीने आणि सुरक्षितरीत्या आपल्या ताब्यात घेतले. पकडण्यात आलेला बिबट्या हा मादी जातीचा असून तिचे वय अंदाजे ६ ते ८ महिने आहे. या बिबट्याची मालगुंड येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वरूप काळे आणि डॉ. रानभरे यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आवश्यक ते औषधोपचार तातडीने सुरू करण्यात आले आहेत. सध्या हा बिबट्या वन विभागाच्या देखरेखीखाली असून त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवून योग्य आहार दिला जात आहे. या बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासाचा शोध घेण्याचे काम आता वन विभागामार्फत सुरू आहे.
या संपूर्ण मोहिमेत परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, परिमंडळ वनाधिकारी एन. एस. गावडे, वनपाल मिलिंद डाफळे, वनरक्षक विराज संसारे, शर्वरी कदम, प्राजक्ता चव्हाण, धनंजय यादव, चालक महेश धोत्रे तसेच प्राणीमित्र ईशान खानोलकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. या यशस्वी कार्यवाहीनंतर विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोठेही वन्यप्राणी अडचणीत सापडल्याचे आढळल्यास किंवा अशा घटना घडल्यास वन विभागाच्या १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा ९४२१७४१३३५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा, जेणेकरून वन्यजीवांचे रक्षण करता येईल.






