राजकीय वातावरण तापले; इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग
प्रतिनिधी : लांजा
एकीकडे ऑक्टोबर हिटमुळे वातावरण चांगलेच तापले असताना, लांजा शहरातील राजकीय पाराही चढू लागला आहे. बुधवारी (८ ऑक्टोबर) लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत १७ प्रभागांपैकी ९ प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने, आगामी नगरपंचायतीवर महिलाराज येणार हे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठीची तयारी करणारे अनेक इच्छुक, आता “मी नाही तर माझ्या पत्नीला का होईना संधी मिळावी” अशा प्रयत्नांत दिसू लागले आहेत. आरक्षण जाहीर होताच शहरात मतदार बांधणीच्या हालचालींना देखील वेग आला आहे.
🏛️ सोडतीचा कार्यक्रम
ही सोडत पोलिस वसाहत परिसरातील संकल्प सिद्धी बहुउद्देशीय सभागृहात पार पडली. या वेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मारुती बोरकर, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार, तहसीलदार प्रियांका ढोले, निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी, तसेच प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक आणि अनघा भाटकर उपस्थित होते.
या सोडतीचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषद शाळा लांजा क्र.५ मधील विद्यार्थी — रिषभ पवार, मयंक मोहिते, सुभद्रा दास, ज्ञानेश्वरी शिंदे आणि शुभ्रा पाटोळे — यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
📋 लांजा नगरपंचायत प्रभागनिहाय आरक्षण
1️⃣ सर्वसाधारण (महिला)
2️⃣ सर्वसाधारण
3️⃣ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
4️⃣ अनुसूचित जाती (महिला)
5️⃣ सर्वसाधारण
6️⃣ सर्वसाधारण
7️⃣ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
8️⃣ सर्वसाधारण
9️⃣ सर्वसाधारण
🔟 सर्वसाधारण (महिला)
11️⃣ सर्वसाधारण (महिला)
12️⃣ सर्वसाधारण (महिला)
13️⃣ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
14️⃣ सर्वसाधारण
15️⃣ नागरिकांचा मागास प्रवर्ग
16️⃣ नागरिकांचा मागास प्रवर्ग
17️⃣ सर्वसाधारण (महिला)
⚖️ राजकीय समीकरणात उलथापालथ
या सोडतीनंतर काही इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला असला, तरी काहींसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. अनेक ठिकाणी नवीन चेहरे पुढे येण्याची शक्यता असून, नागरिकांमध्ये “यावेळी कोण उमेदवारी करणार?” या प्रश्नाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
आता सोडत जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेवर केंद्रीत झाले आहे. पुढील काही दिवसांत कुणाच्या पदरात निराशा येईल आणि कुणाच्या अंगावर गुलाल उडेल, हे येणारा काळच ठरवणार आहे.
लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर; १७ प्रभागांपैकी ९ महिलांसाठी राखीव
