GRAMIN SEARCH BANNER

मंडणगडमध्ये इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग

मंडणगड: मंडणगड शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या अमित इलेक्ट्रॉनिक दुकानाला शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, नगरपंचायतीने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेच्या वेळी दुकानाचे मालक अमित गुजर हे कामानिमित्त बाहेर गेले होते. दुकान बंद असतानाही शटरमधून धूर येत असल्याचे शेजारील दुकानदारांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच संभाव्य धोका ओळखून मदतीसाठी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या मोहिमेत नगरपंचायतीचे कर्मचारी, स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम केले. त्यांच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे आगीवर वेळेत नियंत्रण मिळवता आले आणि पुढील नुकसान टळले.

या आगीत अमित इलेक्ट्रॉनिक दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या वतीने सध्या पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक अमित चिले, रमाकांत साळुंखे, विशाल कोकाटे, शिवप्रसाद कमेरिकर आणि नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला. या सर्वांच्या सहकार्यामुळेच आगीची दाहकता वाढण्याआधीच ती आटोक्यात आणण्यात यश आले.

Total Visitor Counter

2455869
Share This Article