GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे येथे अपघातात जखमी झालेल्या संगमेश्वरच्या तरुणाचा पुण्यात मृत्यू

Gramin Varta
12 Views

अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल

चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावर १६ जुलै रोजी सावर्डे येथे झालेल्या एका भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा अखेर पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील तळवडे येथील सखाराम बिरू बोडेकर (वय ४०) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. सखाराम बोडेकर हे त्यांच्या हिरो होंडा स्प्लेंडर (MH-०८/BB-२५३१) दुचाकीवरून अडरे येथून तळवडे गावाकडे जात होते. याचवेळी मुंबई-गोवा महामार्गावरील श्री हॉस्पिटलसमोर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातामुळे सखाराम बोडेकर रस्त्याच्या बाजूला फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला तसेच उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना पुणे येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान २२ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष रामचंद्र भुवड यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तळवडे गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

Total Visitor Counter

2647133
Share This Article