पुर्ये ग्रामस्थांकडून बापू लोटणकर, सोनाली पवार यांना संधी देण्याची मागणी
साखरपा/ सिकंदर फरास: आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी कोंडगाव आणि दाभोळे या दोन महत्त्वाच्या गणांमधून पुर्ये येथील दोन सक्षम आणि लोकप्रिय व्यक्तींनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. कोंडगाव पंचायत समिती गणातून पुर्ये गावचे विद्यमान उपसरपंच श्री. संजीव (बापू) लोटणकर हे इच्छुक आहेत, तर दाभोळे पंचायत समिती गणातून उच्चशिक्षित प्राध्यापिका सोनाली इंशिवराज पवार यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. पुर्ये ग्रामस्थांनी या दोन्ही उमेदवारांना पक्षाकडून संधी मिळावी यासाठी जोरदार मागणी लावून धरली आहे.
पुर्ये गावचे उपसरपंच बापू लोटणकर यांनी आपल्या कार्यकाळात लोकांमध्ये एक वेगळीच विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली आहे. ‘गावचा विकास हाच आपला ध्यास’ यानुसार कार्यरत असलेले बापू लोटणकर हे गावाच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतात. उपसरपंच म्हणून त्यांनी आपल्या विभागाला न्याय देणारे मोलाचे योगदान दिले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा नेहमीच आग्रह असतो. आमदार श्री. किरण (भैय्या) सामंत आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून त्यांनी गावात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून विकासकामे मार्गी लावली आहेत. नवयुवक वर्गाला त्यांचे नेहमीच मोलाचे पाठबळ असते. त्यांच्या या कामामुळेच कोंडगाव पंचायत समिती गणातून त्यांना उमेदवारी मिळावी अशी लोकांची तीव्र इच्छा आहे. पुर्ये गावाप्रमाणेच कोंडगाव पंचायत गणातही विकासकामे आणि शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात या हेतूने बापू लोटणकर यांनी पक्षाकडे संधी देण्याची विनंती केली आहे.
दुसरीकडे, दाभोळे पंचायत समिती गणातून पुर्ये बौद्धवाडी येथील उच्चशिक्षित सोनाली इंशिवराज पवार या निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झाल्या आहेत. त्यांनी एम.ए. (MA) पदवी प्राप्त केली असून, सध्या त्या आबासाहेब सावंत कला व वाणिज्य महाविद्यालय, साखरपा येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवून विशेषतः निराधार महिलांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करण्याचा त्यांचा मानस आहे.
बापू लोटणकर आणि सोनाली पवार यांसारखे दोन सक्षम उमेदवार आपल्या गावात उपलब्ध असल्यामुळे आणि पुर्ये गावाने आजवर पक्ष आणि युतीच्या पाठीशी नेहमीच भरघोस मतांनी पाठिंबा दिला असल्यामुळे, या दोन्ही उमेदवारांना पक्षाने संधी द्यावी अशी मागणी पुर्ये ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. या दोन लोकप्रिय चेहऱ्यांना उमेदवारी मिळाल्यास दोन्ही गणांमध्ये पक्षाला निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.