रत्नागिरी: स्थानिक महिला उद्योजिकांना त्यांच्या व्यवसायाला योग्य चालना मिळावी, त्यांना थेट ग्राहक मिळवून उत्पादनांना प्रभावी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच व्यवसायाचे अचूक ज्ञान मिळावे, या उदात्त उद्देशाने रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध ‘किचन एक्स्प्रेस’च्या संस्थापिका जैबा शोएब यांनी एक भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. पाडवा आणि भाऊबीज या सणांचे औचित्य साधून रत्नागिरीतील उद्यमनगर येथील नाईक हॉलमध्ये हे दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
या प्रदर्शनाला केवळ रत्नागिरी शहरातीलच नव्हे, तर इतर तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला व्यावसायिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले स्टॉल आरक्षित केले आहेत. या विविध स्टॉल्समध्ये लहान मुले, महिला, पुरुष, तसेच ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील लोकांसाठी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या अपूर्वाताई किरण सामंत यांनी जैबा शोएब यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले असून, त्यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन २२ ऑक्टोबर आणि २३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणारा आणि त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारा हा उपक्रम रत्नागिरीतील महिला शक्तीला बळ देणारा ठरणार आहे.