नवी दिल्ली: भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे! ‘ॲक्झिओम-४’ मोहिमेअंतर्गत भारताचे शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) झेपावण्यासाठी सज्ज झाले आहेत. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार आज पहाटे आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:०१ वाजता हे प्रक्षेपण निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेत शुक्ला यांच्यासह एकूण चार अंतराळवीर अंतराळात जातील.
‘नासा’ आणि स्पेसएक्सच्या संयुक्त प्रयत्नाने मोहीम
‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार, हे अंतराळवीर स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटने ड्रॅगन कॅप्सूलच्या (यान) माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना होतील. या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे नेतृत्व कमांडर पॅगी व्हिटसन करणार असून, भारताचे शुभांशू शुक्ला पायलट म्हणून जबाबदारी सांभाळतील. त्यांच्यासोबत हंगेरीचा अंतराळवीर टिबोर कपू आणि पोलंडचा स्लोव्होज उझ्नान्स्की विस्निव्हस्की हे तज्ज्ञ म्हणून सहभागी असतील.
सहा वेळा लांबले प्रक्षेपण, पण आता मुहूर्त ठरला
या मोहिमेचे पहिले प्रक्षेपण २९ मे रोजी होणार होते. मात्र, स्पेसएक्सच्या फाल्कन रॉकेटच्या बूस्टरमध्ये झालेल्या द्रव ऑक्सिजन गळतीमुळे ते लांबणीवर पडले. त्यानंतर विविध तांत्रिक अडचणींमुळे आणि काही कारणांमुळे हे प्रक्षेपण एकूण सहा वेळा लांबले. आता मात्र फ्लोरिडातील ‘नासा’च्या केनेडी अंतराळ केंद्रावरून हे यान निश्चितपणे प्रक्षेपित केले जाईल. या मोहिमेसाठी भारताने तब्बल ५५० कोटी रुपये खर्च केले आहेत, जे अंतराळ संशोधनातील भारताच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे.
शुभांशू शुक्ला यांच्या या ऐतिहासिक प्रवासासाठी संपूर्ण देशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.