रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या निधी वाटपात मोठी असमानता असल्याचा गंभीर आरोप विनय नातू यांनी केला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरीमार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजनेत जिल्ह्यासाठी ५ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद असून, त्यापैकी बहुतांश रक्कम खर्च झाली आहे. मात्र, हा निधी वाटप करताना जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांना समान न्याय मिळाला नसल्याचे नातू यांनी म्हटले आहे.
विनय नातू यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पाऊस सर्वत्र सारखाच पडत असला तरी, पाणी अडवण्याची कामे केवळ काही निवडक तालुक्यांमध्ये आणि विशिष्ट भागांमध्येच होत आहेत. त्यांच्या मते, दापोली तालुक्यात केवळ दोन कामांसाठी ५० लाख रुपये, तर गुहागर आणि चिपळूण तालुक्यांसाठी एकूण तीन कामांसाठी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघात संगमेश्वर तालुक्यातील तीन कामांसाठी ५० लाख रुपये मिळाले आहेत.
याउलट, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात रत्नागिरी तालुक्यातील सहा कामांसाठी तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, असे नातू यांनी निदर्शनास आणून दिले. राजापूर विधानसभा मतदारसंघात लांजा तालुक्यातील दोन आणि संगमेश्वर तालुक्यातील तीन अशा एकूण पाच कामांसाठी १ कोटी १० लाख रुपये मिळाले आहेत.
या आकडेवारीवरून काही मतदार संघांना ५० लाख, ४० लाख असे कमी निधी मिळत असताना, काही मतदार संघांना कोटीच्या कोटी उडवून ठराविक मतदार संघात, ठराविक व्यक्तींच्या भल्याची कामे मंजूर केली जात असल्याचा आरोप नातू यांनी केला. यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी लागेल, कारण त्यांनीच जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमधील विकासाचा अनुशेष वाढवला आहे.
हा वाढलेला अनुशेष जिल्ह्याच्या जीडीपी वाढीस बाधक ठरत असून, रत्नागिरी जिल्ह्यात सर्व विभागांमध्ये लोकसंख्येच्या निकषानुसार समप्रमाणात निधीचे वाटप व्हावे, अशी मागणी विनय नातू यांनी केली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचा परिपूर्ण विकास होण्यासाठी हे मुद्दे मांडल्याचे नातू यांनी सांगितले.