लांजा : शहरासाठी तयार करण्यात येत असलेल्या विकास आराखड्यात अनेक गंभीर त्रुटी असून यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक आणि भौगोलिक नुकसान होणार असल्याने या आराखड्याला स्थगिती मिळावी अशी जोरदार मागणी लांजा-कुवे बचाव समितीच्यावतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.
लांजा शहर प्रारूप विकास आराखड्याबाबत घेण्यात आलेल्या हरकतींवर ४ ऑगस्ट पासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. त्या अगोदर वेगवेगळ्या घडामोडी घडत असून २७ जुलै रोजी लांजा-कुवे बचाव समितीने राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर समितीच्यावतीने सोमवार २८ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता लांजा शहरातील श्री देव चव्हाटा मंदिर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी पत्रकार परिषदेत लांजा-कुवे बचाव समितीच्यावतीने सांगण्यात आले की, आराखड्याला तातडीने स्थगिती देण्यात यावी या संदर्भात स्थानिक आमदार किरण सामंत, खासदार नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यापूर्वीच निवेदने देण्यात आली आहेत. तसेच २७ जुलै रोजी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची रत्नागिरी येथे भेट घेण्यात आली. यावेळी नितेश राणे यांनी विकास आराखड्याचा मसुदा बारकाईने पाहून त्यामधील त्रुटी लक्षात घेतल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.
या आराखड्याविरोधात सुमारे १५०० नागरिकांनी आपल्या हरकती नगरपंचायतीकडे सादर केल्या आहेत. “टंडन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनीने केवळ कागदोपत्री माहीतीवर विकास आराखडा तयार केला असून, प्रत्यक्ष पाहणीचा अभाव असल्याने नागरिकांचे यामध्ये मोठे नुकसान होणार आहे. शहराचा विकास व्हावा यासाठी विकास आराखडा आवश्यक असला तरी, सद्यःस्थितीत आराखाड्यात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे या आराखड्याला तातडीने स्थगिती द्यावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच जोपर्यंत आराखड्याला स्थगिती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा ठाम निर्धार नागरिकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
दरम्यान, याप्रसंगी लांजा-कुवे बचाव समितीच्यावतीने आयोजित या पत्रकार परिषदेवेळी लांजा आणि कुवे येथील शेकडो नागरिक उपस्थित होते.
शहर विकास आराखड्याला स्थगिती द्या ; लांजा-कुवे ग्रामस्थांचा एकमुखी निर्धार
