रहाटाघर येथील प्रकाराने खळबळ
रत्नागिरी : शहरातील रहाटाघर बसस्थानकासमोरील एका भंगार दुकानातून चोरीची स्कुटी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी गस्तीदरम्यान केलेल्या तपासणीत ही स्कुटी मिळून आली असून, दुकानाचा मालक समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी घडली. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना रहाटाघर बसस्थानकासमोरील भंगार दुकानावर संशय आला. त्यांनी दुकानाची तपासणी केली असता, तिथे एक बजाज कंपनीची ‘स्पिरिट’ स्कुटी (किंमत ५,००० रुपये) आढळून आली. ही स्कुटी पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत होती, तिचे पुढील पॅनल आणि स्पीडोमीटर मशीनही तुटलेले होते. गाडीला नंबर प्लेटही नव्हती.
पोलिसांनी दुकानाचा मालक तानाजी बाबासो गोसावी (वय ४१, रा. रहाटाघर झोपडपट्टी) याच्याकडे गाडीबाबत चौकशी केली. मात्र, तानाजी गोसावी याला गाडीची कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत. तसेच, तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे ही स्कुटी चोरीची असल्याचा पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी तानाजी गोसावी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जप्त करण्यात आलेल्या स्कुटीचा पुढील तपास सुरू असून, मूळ मालकाचा शोध घेतला जात आहे. शहरातील भंगार दुकानांमध्ये चोरीचा माल विकला जात असल्याचा संशय यामुळे बळावला आहे.
रत्नागिरीत धक्कादायक प्रकार ; चोरीची गाडी आढळली भंगार दुकानात, मालकावर गुन्हा दाखल
