किरण चव्हाण यांच्या तक्रारीवर तत्काळ कार्यवाहीचे सीइओना आदेश
रत्नागिरी : लांजा तालुक्यातील हर्दखळे येथील ग्रामस्थ किरण चव्हाण यांनी जलजीवन योजनेतील अर्धवट कामामुळे ग्रामस्थांना पाण्यावाचून तडफडण्याची वेळ येत आहे. कामे अपूर्ण असल्यामुळे पाणी मिळत नाही अशी तक्रार राज्य पाणी व स्वच्छता विभागाकडे ऑनलाइन केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य पाणी व स्वच्छता मिशन विभागाच्या सुषमा सातपुते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किरण चव्हाण यांनी १६ जून २०२५ रोजी केलेल्या तक्रारीची नोंद घेतली असून, त्या तक्रारीचा प्रलंबित अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
लांजा तालुक्यातील हर्दखळे येथे धनगरवाडी, वाडावाडी आणि हर्दखळे PWS, रेस्टॉरिंग ही जलजीवन मिशनमधील कामे मंजूर झाली होती. मात्र, ही कामे अद्याप पूर्ण झालेली नसून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे या कामांची चौकशी करण्याची मागणी केली होती.
या योजनेंतर्गत कामे राबवताना ग्रामस्थांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामे केली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः पाईपलाईन टाकताना ज्यांच्या जागेतून पाईप गेले, त्यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांत नाराजी निर्माण झाली असून, याबाबत किरण चव्हाण यांनी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन जलजीवन मिशन अभियान संचालक सुषमा सातपुते यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अर्जदाराच्या तक्रारीचे निवारण करून त्याला लेखी स्वरूपात उत्तर देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
या आदेशानंतर आता जिल्हा परिषद सीइओ काय अहवाल देतात याकडे हर्दखळे ग्रामस्थ व किरण चव्हाण यांचे लक्ष लागून राहिले आहे.
लांजा हर्दखळे येथील ‘जलजीवन’च्या अर्धवट कामावरून केलेल्या तक्रारीची दखल
