दापोली: परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी पत्र वाटप कार्यक्रमावेळी ग्रामविकास राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. याचा निषेध करण्यासाठी दापोलीतील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन केले.
राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्यभर ‘काळी फीत’ आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत दापोली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी एकत्र येत निषेध नोंदवला. त्यांनी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना एक निषेध निवेदन सादर केले.
या आंदोलनानंतरही कोणतीही कारवाई न झाल्यास, ७ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे मोर्चा काढण्यात येईल, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या मोर्चात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.