रत्नागिरी : रत्नागिरी शहरात अनधिकृत बांधकामांवर नगरपरिषदेने केलेल्या धडक कारवाईबद्दल भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने मुख्याधिकारी तुषार गारवे यांचे अभिनंदन करण्यात आले. मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचे आणि कार्यवाहीचे भाजपने पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी नगर परिषदेकडून शहरात अनधिकृत बांधकामे तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोकणनगर परिसरातील काही बांधकामे आणि साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळील काही अनधिकृत बांधकामे नगरपरिषदेने नुकतीच जमीनदोस्त केली आहेत.
याच पार्श्वभूमीवर, मुख्याधिकारी गारवे यांनी कायद्याचे पालन करत आणि शहराच्या हितासाठी केलेल्या या कारवाईचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी समर्थन केले. मुख्याधिकारी कार्यालयात झालेल्या भेटीदरम्यान भाजपाच्या शिष्टमंडळाने गारवे यांचे अभिनंदन केले.
यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी शहरातील इतर अनधिकृत बांधकामांबाबतही मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली. केवळ काही विशिष्ट ठिकाणीच नव्हे, तर शहरातील सर्व अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. शहरातील शिस्त आणि नियमांचे पालन व्हावे हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, असे पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी गारवे यांना स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासोबत शहराध्यक्ष दादा ढेकणे, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी, ओबीसी महिला मोर्चा शहराध्यक्ष सोनाली केसरकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांच्यासह नितीन जाधव, राजेंद्र पटवर्धन, सचिन गांधी, राजू भाटलेकर, शैलेश बेर्डे, प्रज्ञा टाकळे, केतन कडू, संतोष सावंत आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. नगर परिषदेच्या या कारवाईमुळे शहरात नियमानुसार बांधकामे करण्याला अधिक महत्त्व प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.