खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीच्या बांधकाम साइटवर काम करत असताना २० फूट उंचीवरून खाली पडून एका २५ वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरातील बांधकाम मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ईजाज अहमद (वय २५ वर्ष, सध्या रा. एक्सेल लेबल कॉलनी, लोटे एमआयडीसी, ता. खेड, जि. रत्नागिरी, मूळ रा. डोमाहना, बिकुर, उत्तर दिनजपूर, पश्चिम बंगाल) असे मयत तरुणाचे नाव आहे. ईजाज अहमद हा ‘लिटमस कंपनी’च्या बिल्डिंगचे बांधकाम करत असताना पहिल्या फ्लोअरवरील आरसीसी स्टील वाकवण्याचे काम करत होता. याच दरम्यान, अचानक त्याचा तोल गेला आणि तो सुमारे २० फूट उंचीवरून खाली जमिनीवर कोसळला.
या अपघातात ईजाजच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली, तसेच डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. घटनेनंतर त्याला तातडीने लोटे येथील हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारांसाठी त्याला डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात येत होते. डेरवणला नेत असताना वाटेत त्याची ऑक्सिजन पातळी कमी झाली आणि त्याची हालचाल पूर्णपणे थांबली. त्यामुळे त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे नेण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.४८ वाजता करण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू ची नोंद केली आहे.
खेड : लोटे एमआयडीसीमध्ये बांधकाम साइटवरून पडून २५ वर्षीय मजुराचा मृत्यू
