GRAMIN SEARCH BANNER

किल्ले रायगडकडे जाणारी सहलीची मिनीबस पलटी; ४ विद्यार्थिनींसह चालक, शिक्षक जखमी

Gramin Varta
262 Views

रायगड : सांगली जिल्ह्यातून सहलीसाठी किल्ले रायगड दर्शनाला आलेल्या विद्यार्थ्यांची मिनीबस नांदगाव बुद्रुक (ता. महाड) परिसरात पलटल्याने सहाजण जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या अपघातात चार विद्यार्थिनींसह एक शिक्षक आणि बसचालक जखमी झाले आहेत.

जखमींची नावे : अक्षरा अजय ढोकळे (१६), आदिती रवींद्र खेरमोडे (१६), आदिती दीपक खाडे (१६), सिद्धी दीपक ढोकळे (१६), चालक योगेश वसंतराव जाधव (३५) आणि शिक्षक जगन्नाथ विश्वास येवले (४५). सर्व जखमी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रहिवासी असून ते छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, बाऊच या शाळेतील विद्यार्थी आहेत.

अपघातानंतर सर्वांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, महाड येथे दाखल करण्यात आले. त्यापैकी आदिती खेरमोडे हिला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचे पुढील उपचारासाठी माणगाव येथे हलविण्यात आले. उर्वरित जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.

ही विद्यार्थी मंडळी शनिवारी रात्री ११ वाजता खाजगी बसने सहलीसाठी निघाली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास महाड–रायगड मार्गावर नांदगाव बुद्रुक हद्दीत चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या विरुद्ध बाजूस जाऊन उलटले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

घटनेची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून बसचालकावर निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3376153
Share This Article