प्रांत, तहसिलदार, पोलीस निरीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन नियोजन करावे– जिल्हाधिकारी
रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. संगमेश्वर आणि लांजा येथील पुलाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहील, यासाठी प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. त्याबाबत नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
गणेशोत्सव 2025 निमित्त पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अपर पोलीस अधिक्षक बाबूराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, सहाय्यक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यात येणारे घाट रस्ते, महामार्ग याठिकाणी वाहतूक मदत केंद्र, रुग्णवाहिका, जेसीबी, क्रेन राहतील याचे नियोजन करावे. राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावेत. वळण रस्त्यावर रम्बलर, वेग मर्यादेबाबतचे फलक, आपत्कालीन संपर्क क्रमांक, दिशादर्शक, 24 तास फिरते गस्त पथके यावर भर द्यावा.
रिक्षा धारकांकडून अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही, याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नियोजन करावे. मुंबई तसेच इतर शहरातून रत्नागिरी येथे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांकरिता रेल्वे स्थानकावर जादा बसेस परिवहन मंडळाने ठेवाव्यात. गणेशोत्सव काळामध्ये मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रतिबंध ठेवण्याबाबत कार्यवाही करावी.
सुविधा केंद्र
गणेशोत्सवानिमित्त मुंबई गोवा महामार्गावर पुढील ठिकाणी पोलीस मदत केंद्र असणार आहेत. खेड- हॉटेल अनुसया, हॅप्पी धाबा, भोस्ते घाट, भरणे नाका. चिपळूण – सवतसडा दर्शन, कळंबस्ते तिठा, बहादूरशेख नाका, अलोरे घाट माता, सावर्डे बाजारपेठ. संगमेश्वर – अरवली एसटी स्थानकाजवळ, देवरुख- मुरशी बावनदी पुलाच्या पलिकडे, रत्नागिरी – हातखंबा तिठा, पाली, बावनदी पुलाच्या अलिकडे, कोकजे वठार येथील नवीन पुलाजवळ. लांजा – वेरळ कुवे गणपती मंदिरासमोर. राजापूर – एसटी स्थानक