समाजप्रबोधनपर घोषवाक्य ठरली लक्षवेधी
जाकादेवी/संतोष पवार : रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्था संचलित मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी वारकरी दिंडीचे मोठ्या उत्साहात जाकादेवी मंदिर ते चाफे महाविद्यालय अशी ३ कि.मी पायी दिंडी विठू -माऊलीचा गजर ,भजन- कीर्तनाने यशस्वीपणे संपन्न झाली.
जाकादेवी येथील मंदिरामध्ये जाकादेवी देवीचे दर्शन घेऊन जाकादेवी बाजारपेठ मार्गाने ही दिंडी चाफे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये दाखल झाली. या दिंडीत पारंपरिक वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. हातात भगवा झेंडा घेऊन टाळ, मृदुंगाचा ठेका धरत विद्यार्थी व महाविद्यालयीन छोटे मोठे वारकरी विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन हरिनामाचा गजर करीत उत्साहाच्या वातावरणात पायी जात दिंडीत अक्षरशः रंगून गेले. विठुरायाचा जयघोष करीत हे सर्व विद्यार्थी मुख्य रस्त्याने जात असताना जाकादेवी बाजारपेठ तसेच परिसरात पालक वर्ग देखील सामील होऊन वारकरी विद्यार्थांचा उत्साह अधिकच वाढवला. जाकादेवी हायस्कूल, डी.जे. सामंत इंग्लिश स्कूल व चाफे महाविद्यालयाचे विद्यार्थी या वारकरी दिंडीत पारंपरिक वारकरी वेशभूषेत दंग झाले होते.
प्रसिद्ध जाकादेवी मंदिर ते मोहिनी मुरारी मयेकर चाफे सिनियर कॉलेज असा सुमारे ३ कि.मी. अंतराचा प्रवास पार केला.या वारकरी दिंडीचा शुभारंभ जाकादेवी मंदिरात मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक व जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रोहित मयेकर, उपाध्यक्ष नंदकुमार साळवी ,मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक व जाकादेवी प्रशालेचे सीईओ किशोर पाटील, जाकादेवी प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ,चाफे महाविद्यालयाच्या प्राचार्य स्नेहा पालये, संचालक सुरेंद्र माचिवाले, ऋषिकेश मयेकर, नानी मयेकर,सौ. राधिका मयेकर, खालगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच कैलास खेडेकर, पत्रकार संतोष पवार, पत्रकार संदीप खानविलकर तसेच परिसरातील विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकरी दिंडी सुरक्षितपणे संपन्न करण्यासाठी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, गावचे पोलीस पाटील यांनी उत्तम कामगिरी बजावली.विशेष म्हणजे या दिंडीत पर्यावरण, स्वच्छता, वृक्षारोपण यांविषयी जनजागृतीचे फलक लक्षवेधी ठरले.