GRAMIN SEARCH BANNER

दापोली-मुरुड येथे पर्यटकांच्या मिनी बसचा भीषण अपघात; वाहनांचे मोठे नुकसान

Gramin Varta
248 Views

दापोली: दापोली तालुक्यातील मुरुड येथे पुणे येथून आलेल्या पर्यटकांच्या मिनी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुणे येथील पर्यटकांना घेऊन येणारी एमएच १२ व्हीएफ ९३९० क्रमांकाची मिनी बस मुरुड परिसरात अचानक रस्त्यावर पलटी झाली आणि समोरून येणाऱ्या दोन ते तीन वाहनांना या बसने जोरात धडक दिली. या विचित्र अपघातामध्ये समोरील तीन कारचे प्रचंड नुकसान झाले असून कारमधील प्रवाशांना सुदैवाने केवळ किरकोळ दुखापती झाल्या आहेत. मात्र, मिनी बसचा चालक या अपघातात जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे सध्या मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी असून रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ पाहायला मिळत आहे. या अपघातामुळे मुरुड रस्ता काही काळासाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता, परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती हाताळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत पर्यटकांना मुरुडकडे जाण्यासाठी आसूद-सालदुरे फाटा या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3367000
Share This Article