रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे ट्रान्सपोर्ट कंपनीच्या एका सुपरवायझरवर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी स्थानिक सत्र न्यायालयाने एका ट्रकचालकाला १० वर्षांची सक्तमजुरी आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. योगेश अनंत सावंत (वय ३५, रा. सैतवडे, बलभिमवाडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जयगड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.
रत्नागिरीचे सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे ॲड. अनिरुद्ध फणसेकर यांनी बाजू मांडली.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश सावंत हा जयगड येथील साहस ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रकचालक म्हणून कार्यरत होता, तर संदेश सुरेश पवार (वय ३५, रा. वाटद खंडाळा) याच कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता.
ही धक्कादायक घटना ८ नोव्हेंबर २०२० रोजी घडली. संदेशने योगेशला मालवाहतूक ट्रकचे चलन कार्यालयात जमा करण्यास सांगितले होते. यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. योगेशने ते चलन संध्याकाळी जमा करतो असे सांगितले, त्यामुळे संदेश त्याची वाट पाहत उभा होता. रात्री १० च्या सुमारास योगेश मोटारसायकलवरून तिथे आला आणि चलन जमा करण्यावरून दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. यानंतर योगेश तिथून निघून गेला.
मात्र, रात्री १०.४५ च्या सुमारास योगेश पुन्हा संदेश उभा असलेल्या ठिकाणी आला. यावेळी त्याने आपल्या टी-शर्टमध्ये लपवलेली तलवार काढून थेट संदेशच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. संदेशने प्रसंगावधान राखून वार चुकवण्याचा प्रयत्न केला, तरी तलवारीचे टोक त्याच्या कपाळावर लागले आणि तो जखमी झाला. योगेश तलवारीने वार करत असल्याचे पाहून संदेशसोबत असलेल्या दोघांनी त्याला तात्काळ अडवले आणि त्यानंतर सर्वजण सुरक्षित स्थळी पळाले.
तलवारीच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या संदेशला तात्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या गंभीर हल्ल्याप्रकरणी संदेशने जयगड पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी योगेशविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. जयगड पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक रायसिंग पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. तसेच, पोलीस हेड कॉन्स्टेबल वंदना लाड यांनी न्यायालयापुढे पैरवी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.