महामार्ग सुरू होण्यापूर्वीच खड्ड्यांचे साम्राज्य; निकृष्ट कामामुळे सावर्डेतील रस्ता ‘मृत्यूचा सापळा’

Gramin Varta
279 Views

सावर्डे (विनायक सावंत) : कोट्यवधी रुपये खर्चून उभारला जात असलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ अद्याप पूर्णत्वासही गेलेला नाही, मात्र त्याआधीच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडू लागल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे आरती स्वीटसमोर पडलेला भलामोठा खड्डा सध्या वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे.

महामार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी आणि रुंदीकरणासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रस्ता उखडल्याचे चित्र दिसत असून, खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांचा संताप वाढत आहे. महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच अशी अवस्था होत असेल, तर पुढील काही वर्षांत या रस्त्याचे काय होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सावर्डे येथील आरती स्वीटसमोर रस्त्याला दोन्ही बाजूंनी उतार असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. याच ठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकीस्वार वारंवार अपघातग्रस्त होत आहेत. अनेक चारचाकी वाहनांचे टायर फुटल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. पावसाचे पाणी साचल्याने खड्डा नजरेस पडत नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

“ठेकेदार कोणाच्या जीवाची वाट पाहत आहेत का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. अपूर्ण कामे, निकृष्ट दर्जा आणि दुर्लक्ष यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ‘विकासाचा महामार्ग’ न राहता ‘मृत्यूचा महामार्ग’ बनत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाने तातडीने या खड्ड्याची दुरुस्ती करून ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात एखादा जीव गेल्यास संबंधित ठेकेदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा ठेकेदारांचा निष्काळजीपणा मोठा ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4576961
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *