रत्नागिरी: योगऋषी स्वामी रामदेवजी महाराजांच्या आशीर्वादाने संचालित पतंजलि योग समिती आणि परिवाराच्या वतीने जागतिक योगदिनी २१ जून रोजी सकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.हॉटेल विवेकच्या बँक्वेटस् हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गोसावी, विधी सेवा प्राधिकरणचे सेक्रेटरी श्री. पाटील उपस्थित राहणार आहेत. आयुर्वेदाचार्य विवेक इनामदार यांचे योग आयुर्वेद व जीवनशैली यावर भाषण होईल. रा. भा. शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे योग पिरॅमिड प्रात्यक्षिक, सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक सादर होईल. किसान सेवा समितीचे भारत सावंत योग गीत सादर करतील. पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी ॲड. विद्यानंद जोग प्रोटोकॉलचा कार्यक्रम सांगणार आहेत.
योग ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली अमूल्य देणगी आहे. या भारतीय प्राचीन परंपरेचा व संस्कृतीचा सर्व देशांमध्ये प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी अनेक भारतीयांनी कार्य केले. त्यामध्ये योगऋषी प. पू. रामदेवजी महाराजांचे नाव अग्रभागी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे २१ जून हा दिवस दरवर्षी सर्व देशांमध्ये जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.
पतंजलीच्या महिला राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. रमा जोग, भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हा प्रभारी मारुती अलकुटे, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी ॲड. विद्यानंद जोग, किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी भारत सावंत, युवा भारतचे जिल्हा प्रभारी ब्रिजेश पटेल, महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी सौ. हर्षदा डोंगरे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेत आहेत. रत्नागिरीकरांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व योगाभ्यासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : पतंजली योग समिती परिवारातर्फे उद्या जागतिक योग दिन

Leave a Comment