GRAMIN SEARCH BANNER

विधानभवनात भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात शाब्दिक वाद

मुंबई: सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अशातच भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्यणाशेट्टी आणि शिवसेना उबाठा गटाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे बघायला मिळाले.विधीमंडळ परिसरातच दोन आमदारांची बाचाबाची झाली. विधानसभा परिसरात सभागृहाच्या बाहेरील लाॅबीमध्येच हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, तुम्ही बाप काढलाय, बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे का? तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहे. तुम्ही बाप काढला तर मीही काढेल, असं म्हणत सचिन कल्याणशेट्टी यांनी भास्कर जाधवांना जाब विचारला. तर यावर भास्कर जाधवांनी प्रत्युत्तर देतांना म्हटलं कि तुम्हाला माझा बाप काढायचा असेल तर काढा, असं म्हटलंय.वादाचं नेमकं कारण पाहिले तर भाजप आमदार राहुल आवाडे यांची मुलगी सानिका आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे चिरंजीव अजय यांचा विवाह सोहळा 15 मार्च रोजी पार पडणार आहे. त्या अनुषंगाने एकाच ठिकाणी सोईस्कर होईल म्हणून आमदारांच्या खासगी सहाय्यकांकडून लग्नपत्रिकेचे वाटप केले जात होते, त्यावरुन हा वाद झाला. अशातच, विधीमंडळ आवारात पत्रिका वाटत असल्याने भास्कर जाधवांकडून टीका करण्यात आली. जाधवांनी सरकारचा बाप काढल्याने भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी भडकले. यावर काही हरकत असेल तर तक्रार करा, बाप काढायचा अधिकार कुणी दिला म्हणत कल्याणशेट्टी आक्रमक झाले आणि सचिन कल्याणशेट्टी यांनी भास्कर जाधवांना धारेवर धरले. भास्कर जाधव म्हणाले, इथं खासगी काम कसं काय सुरु आहे? सरकारी नोकर हे काम कसं करु शकतात? तुमच्याकडून मला काही शिकायची गरज नाही. तुम्ही सत्ताधारी असूद्या किंवा मंत्री असूद्यात.. इथं खासगी काम कसं सुरु आहे? या वादामुळे परिसरात काहीकाळ एकच गोंधळ झाल्याचे बघायला मिळालं.दरम्यान, या सर्व प्रकारावर सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, भास्कर जाधव कर्मचाऱ्यांना रागावत होते. मी सभागृहात प्रवेश करत होतो, तेव्हा ते सरकारचा बाप काढत होते. ते अपशब्द वापरत होते, ते माझ्या कानावर पडलं. या संदर्भात मी त्यांना तक्रार करा, असं सांगत होतो. बाहेर आल्यावर काय बोलावं हे सांगत होतो. इथे परिवार म्हणून राहातो, लग्न पत्रिका एकमेकांना देतच असतो ना, म्हणून काय कोणाचा किंवा सरकारचा बाप काढणं योग्य नाही. त्यांना समजावून सांगत होतो, मात्र त्यांना कळत नव्हतं. विरोधी पक्षनेतेपद मिळत नाही, म्हणून ते असे वागत असावे. मूळात हे वागणं चुकीचं होतं, सरकारचा बाप काढणं योग्य नव्हतं, असेही सचिन कल्याणशेट्टी म्हणाले.

Total Visitor Counter

3486895
Share This Article