रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील नाचणे रस्त्यावर मोकाट गुरांनी अक्षरशः कब्जा केल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. रात्रीच्या अंधारात, विशेषतः विनम्रनगर परिसरात, तब्बल २० ते २५ गुरांचा कळप रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडून बसलेला आढळत आहे. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून, कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरी नगर परिषदेने शहरातून ४२ मोकाट जनावरे पकडल्याचा दावा केला होता. मात्र, नाचणे रस्त्यावरील ही भयावह स्थिती पाहता, नगर परिषदेचा हा दावा केवळ कागदोपत्रीच राहिला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. शहराच्या मुख्य मार्गांवरच जर अशी परिस्थिती असेल, तर इतर भागांची कल्पनाच न केलेली बरी, असे नागरिक बोलत आहेत.
शहरात ठिकठिकाणी गुरे मोकाटपणे फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने आणि प्रभावी कारवाई न केल्यास नागरिकांचा संयम सुटण्याची शक्यता आहे. ‘आता तरी नगर परिषद जागे होणार का?’ असा संतप्त सवाल नागरिक विचारत असून, प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.