GRAMIN SEARCH BANNER

नागपूर: राऊळगाव येथे स्फोटक कंपनीत भीषण स्फोट, १८ जण ठार

नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील ‘एसबीएल एनर्जी’ या स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी भीषण स्फोट होऊन १८ कामगारांचा मृत्यू झाला, तर २३ जण गंभीर जखमी झाले आहेत.मृत आणि जखमींमध्ये सर्वाधिक महिला आहेत. डेटोनेटर्स बनविणाऱ्या या कंपनीत ‘नोनल क्रिम्पिंग’ युनिटमध्ये ‘डेटोनेटर्स सेल’च्या पॅकिंगचे काम सुरू होते. सकाळी सव्वासातला तेथे स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. या युनिटमधील ४० कामगारांपेकी १८ कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य युनिटमधील कामगार जखमी झाले.स्फोटाचे कारण अस्पष्टच, चौकशी सुरूस्फोट नेमका कोणत्या कारणांमुळे झाला हे ‘पेसो’ तसेच राज्य शासनाच्या औद्योगिक सुरक्षा विभागाच्या तपासणीतून समोर येईल. घटनास्थळाची फॉरेन्सिक चौकशीदेखील सुरू आहे व पथकदेखील तेथे पोहोचले. एसडीआरएफ व अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने येत मदतकार्याला सुरुवात केली. या स्फोटाचे नेमके कारण अस्पष्ट असून चौकशी सुरू आहे. काही मृतकांची ओळख डीएनए चाचणीनंतरच पटू शकेल, अशी माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.नातेवाइकांचा आक्रोश, नाव जाणून घेण्यासाठी धडपडस्फोटात नेमके कोण जखमी झाले आहे व कोण वाचले आहे, याची माहितीच कळत नव्हती. आपल्या जीवलगांची काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी नातेवाइकांची धडपड सुरू होती. जखमींची यादी जारी करण्यात आली. मात्र, मृतकांमध्ये कुणाचा समावेश आहे हे दुपारपर्यंत कळले नव्हते. अधिकृत यादी न आल्याने कामगारांचे नातेवाईक भर उन्हात कंपनीसमोर उभे असल्याचे दिसून आले.कंपनीचा दावा, कुठलेही सक्रिय उत्पादन सुरू नव्हतेया प्रकरणात ‘एसबीएल’ कंपनीकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. जेथे स्फोट झाला तेथे कुठलेही सक्रिय उत्पादन कार्य सुरू नव्हते, असा दावा कंपनीने केला आहे. स्फोटाचे नेमके कारण काय आहे, याचा शोध सुरू आहे. जखमींना चांगले उपचार मिळावे यावर आमचा भर असून, मृतक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक आर्थिक मदत करण्यात येईल. अंतर्गत चौकशी सुरू केली असून, त्याच्या निष्कर्षांच्या आधारे पुढील पावले उचलण्यात येतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.ही आहेत मृतकांची नावेपायल गजभिये, मीना उईके, प्रतिभा वाळके, दुर्गा गायकवाड, शोभा तापसे, अनुसया पाटील, सुनीता सलामे, ज्योत्स्ना शेंद्रे, मंगेश्री येस्कर, संगीता पंचांभाई, गोपी किशोर कोवे, सुनंदा चिंचखेडे, सविता काळमेघ, गणेश टोंगे, राजेंद्र कुळमेथे, प्रेमदास बागडे.सात लाखांची मदत, सखोल चौकशी होणारमृतांच्या वारसांना केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये व जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तर राज्य शासनाकडूनदेखील पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले. हा स्फोट दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्तकरतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Total Visitor Counter

3485115
Share This Article