राजापूर : गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदार हुस्नबानू खलिफे यांनी आंबेवाडी येथील आय.टी.आय. (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) शाळेला भेट दिली. या दौर्यात आमदार खलिफे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, शैक्षणिक सुविधा, बससेवा, वसतिगृह व्यवस्था याबाबत माहिती घेतली.
शाळेतील अध्यापन व्यवस्था, प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांविषयी त्यांनी संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या अडचणी व अपेक्षा खलिफे मॅडमसमोर मोकळेपणाने मांडल्या.
या दौर्यात सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम आणि अमृत तांबडे यांच्या संकल्पनेतून ‘भारतीय फळझाडे’ – आंबा, काजू, नारळ, आवळा, लिंबू आदींचे वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम आमदार खलिफे यांच्या हस्ते पार पडला. पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम जागवण्याचा उद्देश यामागे होता.
या वेळी बोलताना आमदार खलिफे म्हणाल्या, “देशाचे भवितव्य शिक्षणातून घडते. येथे दिले जाणारे तांत्रिक शिक्षण विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवते आणि रोजगाराच्या संधी निर्माण करते. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही घेतली पाहिजे.”
कार्यक्रमाला आय.टी.आय.चे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुपौर्णिमेच्या औचित्याने झालेला वृक्षारोपण व संवादाचा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
राजापूर : गुरुपौर्णिमेनिमित्त माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांची आय.टी.आय.ला भेट; विद्यार्थ्यांशी संवाद साधून वृक्षारोपणाचा उपक्रम
