GRAMIN SEARCH BANNER

स्वतःच ठेवायचं झाकून, आणि दुसऱ्याच बघायच वाकून अशी मोहन घुमे यांची स्थिती : ॲड. जमीर खलिफे यांची घुमेंवर खरमरीत टिका

महायुतीच्या निधीतून शहरात निकृष्ट कामे झाली तेव्हा घुमे यांना दिसल नाही का?

राजापूर : शहरातील मुख्य रस्त्याचे काम झाले तेव्हा राज्यात महायुती सत्ता होती आणि या कामा ठेकेदार तुमच्या महायुतीतील एका घटक पक्षाचा पदाधिकारी होता. त्यामुळे मोहन घुमे यांनी आधी परिपूर्ण माहिती घेवून नंतर आरोप करावेत. राहिला प्रश्न निवडणुकिचा, तर माझ्या नगराध्यक्ष पदाच्या काळात शहराच्या विकासासाठी मी कोट्यवधीचा निधी आणला आहे. मात्र शहरासाठी एकही रूपया निधी न आणनाऱ्या आणि मतदारांनी अनेक वेळा धुळ चारलेल्या घुमे यांना आता निवडणुकीची दिवा स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ते असे बालीश आरोप करत असल्याची खरमरीत टिका माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी केली आहे.

मुख्य रस्त्याच्या कामासाठी माजी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत 1 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यानंतर 2023 मध्ये राज्यात भाजपा, शिवसेना शिंदे गट अशी महायुती सत्ता असताना तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी रस्त्याच्या कामासाठी लागणारा 60 लाखांचा उर्वरित निधी मंजूर केला होता. त्यानंतर महायुतीतील एका घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाचा ठेका घेतला होता.

काम सुरू असताना ज्या-ज्या वेळी त्रृटी जाणवल्या, त्या-त्या वेळी आपण आवाज उठविला. लेखी तक्रारीही प्रशासनाकडे दाखल केल्या आहेत. मात्र राजकीय दबावातून हे काम रेटवून नेण्यात आले. “काम सुरू असताना ते निकृष्ट आहे हे घुमे यांना का दिसले नाही? तेव्हा त्यांनी विरोध का केला नाही? आता अचानक त्यांना साक्षात्कार कसा झाला?” असे सवाल ॲड. खलिफे यांनी उपस्थित केले आहेत.

दिवटेवाडी येथील देवझरीच्या कामासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार आपण 50 लाख रूपयांचा निधी मंजूर करून आणला होता. मात्र घुमे यांनी शहराच्या विकासासाठी एक रूपया तरी निधी आणला का, याचं उत्तर त्यांनी द्यावं, असेही त्यांनी नमूद केले.

“महायुतीच्या निधीतून शहरात अनेक निकृष्ट कामे झाली आहेत, ती घुमे यांना का दिसत नाहीत? स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्यावर आरोप करायचे, ही त्यांची सवय आहे,” असा टोलाही खलिफे यांनी लगावला आहे.

मतदारांनी याआधी अनेकदा नाकारलेले, दुहेरी आकडाही न गाठणारे घुमे आता पुन्हा नगरपरिषद निवडणुकीची स्वप्ने पाहू लागले आहेत. भाजप तालुकाध्यक्ष पद मिळाल्यामुळे हुरळून गेलेले घुमे आता निवडणुकीसाठी सज्ज झाले असून प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करत आहेत, असा आरोप खलिफे यांनी केला.

“तुम्ही एका मोठ्या पक्षाचे जबाबदार तालुकाध्यक्ष आहात, त्यामुळे जबाबदारीने वागा. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आरोप करू नका. आणि दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा स्वतःच्या प्रभागातील विकासासाठी निधी आणण्याचे काम करा,” असा सल्लाही त्यांनी दिला.

Total Visitor

0225025
Share This Article