GRAMIN SEARCH BANNER

एसटी सवलतधारकांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य; रत्नागिरीत नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी:एसटी महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता आधारकार्ड ऐवजी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात आले असून, रत्नागिरी जिल्ह्यात या प्रक्रियेला वेग आला आहे. बोगस आधारकार्डचा वापर करून प्रवास करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी आणि केवळ पात्र लाभार्थ्यांनाच सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी महामंडळाने हे स्मार्ट कार्ड सुरू केले आहे. रत्नागिरी शहरातील नवीन बसस्थानकात सुरू असलेल्या या नोंदणी मोहिमेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २५० हून अधिक जणांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे, तर संपूर्ण राज्यात हा आकडा १० हजारांच्या पार गेला आहे.या कार्ड नोंदणीसाठी प्रत्येक बसस्थानकावर विशेष एजंटची नियुक्ती करण्यात आली असून, रत्नागिरी तालुक्यासाठी एक लाख कार्ड वितरणाचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. सकाळी ९:३० ते १ आणि दुपारी २ ते ४:३० या वेळेत ही नोंदणी प्रक्रिया सुरू असते, तर रविवारी हे काम बंद राहणार आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी महिला तसेच ६५ व ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना स्वतः बसस्थानकावर उपस्थित राहावे लागणार आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड आणि १९९ रुपये शुल्क आवश्यक असून, ज्येष्ठ नागरिकांच्या हाताचे ठसे (बायोमेट्रिक) देखील घेतले जात आहेत.एसटी महामंडळाचे मुंबई येथील सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील प्रत्येक आगारात एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू झाली आहे. सध्यातरी एसटी प्रवासात या कार्डची सक्ती करण्यात आलेली नसली, तरी भविष्यात सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे सर्व पात्र प्रवाशांनी वेळेत आपली नोंदणी करून स्मार्ट कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्ड काढण्यासाठी सध्या बसस्थानकांवर सवलतधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून, प्रवाशांमध्ये या नवीन सुविधेबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

Total Visitor Counter

3486971
Share This Article