दापोली: तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लाडघर येथील एका हॉटेलच्या जिन्यावरून कोसळून ३४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सद्दाम यासीन मुरुडकर (रा. टांगर, ता. दापोली) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे दापोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना ४ मार्च २०२६ रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास लाडघर येथील ‘नौका बीच’ हॉटेलमध्ये घडली.मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम मुरुडकर हा हॉटेलच्या जिन्यावरून खाली पडल्याची माहिती शशिकांत बागल यांनी त्याचे चुलत भाऊ इरफान जमाल मुरुडकर यांना फोनवरून दिली. माहिती मिळताच इरफान मुरुडकर, निसार मुरुडकर आणि गावातील इतर नातेवाईकांनी तातडीने हॉटेल गाठले. यावेळी सद्दाम हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. पोलीस अधिकारी आणि नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णवाहिकेने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुपारी १२:४० वाजण्याच्या सुमारास येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २३/२०२६ नुसार कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. या घटनेची नोंद सायंकाळी ५:४१ वाजता करण्यात आली असून, हॉटेलच्या जिन्यावरून पाय घसरून हा अपघात झाला की अन्य काही कारण होते, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. ऐन तारुण्यात सद्दामचा असा अपघाती मृत्यू झाल्याने टांगर गावात शोककळा पसरली आहे.
दापोली: लाडघर येथे हॉटेलच्या जिन्यावरून पडून तरुणाचा मृत्यू







