GRAMIN SEARCH BANNER

फुणगूस आरोग्य केंद्राचा ‘यमराज’ कारभार; विंचूदंश झालेल्या महिलेची वेदनेने तडफड, पण सरकारी दवाखान्याला कुलूप!

Gramin Varta
220 Views

वारंवार बातम्या, उपोषणे होऊनही परिस्थितीत सुधारणा शून्य; जिल्हा व तालुका आरोग्य प्रशासन  निद्रिस्त

संगमेश्वर/एजाज पटेल: फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार आता केवळ बेजबाबदार राहिलेला नसून तो थेट रुग्णांच्या जीवावर बेतू लागला आहे. रात्रीच्या वेळी विंचूदंश झालेल्या एका दुर्गम वाडीतील महिलेला उपचारासाठी आणले असता, आरोग्य केंद्राला ठोकलेले कुलूप आणि गायब असलेले डॉक्टर-कर्मचारी पाहून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, येथील अनागोंदी कारभाराबाबत वेळोवेळी वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिद्ध झाल्या, समाज माध्यमांतून आवाज उठवला गेला आणि संतापलेल्या नागरिकांनी उपोषणेही केली, मात्र या सर्व गंभीर प्रकारांची पूर्ण कल्पना असूनही तालुका आणि जिल्हा आरोग्य प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप आता स्थानिक जनतेतून केला जात आहे.

फुणगूस परिसरातील भौगोलिक परिस्थिती पाहता, येथील हजारो लोकांसाठी हे आरोग्य केंद्र उपचाराचे एकमेव साधन आहे, मात्र अशा महत्त्वाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी कुलूप असल्याने ‘विहीर उशाला आणि कोरड घशाला’ अशी भीषण अवस्था रुग्णांची झाली आहे. मध्यरात्री विंचूदंश झालेल्या महिलेला घेऊन नातेवाईक ४-५ किमी अंतरावरून मोठ्या आशेने येथे आले, पण संपूर्ण इमारत काळोखात आणि कुलूपबंद असल्याने वेदनेने तडफळणाऱ्या महिलेची मोठी फरफट झाली. अखेर फुणगूस केंद्रात उपचार न मिळाल्याने नातेवाईकांना त्या अवस्थेत महिलेला घेऊन तब्बल १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जाकादेवी आरोग्य केंद्रात धाव घ्यावी लागली. सुदैवाने, जाकादेवी येथे तत्पर सेवा मिळाल्याने त्या महिलेवर वेळीच उपचार सुरू झाले, मात्र फुणगूसमधील या ‘सावळ्या गोंधळा’मुळे एखादी न भरून येणारी हानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण, असा जळजळीत सवाल उपस्थित होत आहे. वारंवार तक्रारी करूनही जिल्हा आरोग्य प्रशासन ढिम्म राहिल्यामुळेच कर्मचाऱ्यांचे धाडस वाढले असून, आता एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. दोषींवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही आता देण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3366931
Share This Article