तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप
रत्नागिरी: तालुक्यातील उक्षी वांद्री परिसरातील जिओ नेटवर्क गेल्या चार दिवसांपासून पूर्णपणे कोलमडले असून, यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रार करूनही कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. नेटवर्क अभावी परिसरातील ऑनलाइन कामे ठप्प झाली असून, तातडीने सुधारणा न झाल्यास जिओ कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत.
गेल्या चार दिवसांपासून उक्षी वांद्री परिसरात जिओच्या सेवेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद असल्याने ऑनलाइन बँकिंग, महत्त्वाची कार्यालयीन कामे आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विशेषतः ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या नोकरदारांची कामे रखडली असून त्यांना नोकरीच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाइलवरून संपर्क साधतानाही मोठी कसरत करावी लागत असून, फोन लागत नाहीत आणि लागल्यास मध्येच खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात एकीकडे हायस्पीड 5G सेवा देण्याचे दावे कंपनीकडून केले जात असताना, प्रत्यक्षात उक्षी वांद्री सारख्या ग्रामीण भागात साधी 2G नेटवर्कची सेवाही कंपनी देऊ शकत नसल्याचे विदारक चित्र दिसत आहे. यामुळे कंपनीच्या जाहिराती आणि प्रत्यक्षातील सेवा यामध्ये मोठी तफावत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या संदर्भात संतप्त ग्रामस्थांनी रत्नागिरी येथील जिओ कार्यालयाशी संपर्क साधला असता, तांत्रिक काम सुरू आहे आणि लवकरच सेवा पूर्ववत होईल, असे उत्तर देण्यात आले. मात्र, चार दिवस उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्याने कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वरिष्ठ अधिकारी या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. नेटवर्कअभावी दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले असून, डिजिटल युगाच्या बाता मारणारी कंपनी ग्रामीण भागात मूलभूत सेवा देण्यातही अपयशी ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने आणि संबंधित कंपनीने या प्रकरणी त्वरित लक्ष घालून नेटवर्कची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर येत्या काळात ही सेवा सुरळीत झाली नाही, तर परिसरातील सर्व ग्रामस्थ एकवटून जिओच्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा नेणार असल्याचे समजते.





