खेड: अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल ६८ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात खेड पोलिसांना मोठे यश आले आहे. गुलाम मोहिद्दीन रफिक परकार (वय ३२, रा. साखरोली, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो सौदी अरेबियातून मुंबईत दाखल होताच पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, आरोपी गुलाम याने एका महिलेशी संबंध प्रस्थापित करून तिचे खासगी फोटो व व्हिडिओ काढले होते. हे फोटो सोशल मीडियावर तसेच महिलेच्या पतीला पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याने खंडणीची मागणी सुरू केली. सप्टेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत त्याने पीडितेकडून तब्बल ६८ लाख रुपये ऑनलाइन माध्यमातून उकळले. जानेवारी २०२६ मध्ये तो सौदी अरेबियात नोकरीसाठी गेला होता, मात्र तिथूनही त्याने पैशांसाठी दबाव टाकणे सुरूच ठेवले. महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने अश्लील फोटो तिच्या पतीला पाठवून मानसिक छळ केला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी १८ एप्रिल २०२६ रोजी सौदीहून मुंबईत परतणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. जी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक अहीरे यांच्या पथकाने मुंबईत सापळा रचला. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आणि तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून ७ लाख रुपयांची चारचाकी गाडी, आयफोन आणि सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा असे दोन महागडे मोबाईल व पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला २३ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून रत्नागिरी पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या सायबर ब्लॅकमेलिंगला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.







