GRAMIN SEARCH BANNER

राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार

Gramin Varta
168 Views

मुंबई : राज्यात सध्या काही भागात हलक्या ते मध्यम सरी तर काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईसह पुणे आणि आसपासच्या भागात सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांनी पडलेल्या मुसळधार पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.

दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह हलक्या सरी बरसत आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती.

मुंबईत पावसाने ओढ दिल्यामुळे उकाडा वाढला होता. दरम्यान, मुंबईसह पुणे आणि इतर काही भागात सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक दिवसांनी पडलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मुंबईत सकाळी पावसाचा जोर अधिक होता. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. मुसळधार पावसामुळे मुंबईतील तापमानात घट झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी २७ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात २७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा दोन्ही केंद्रावर ३ अंशाने कमी तापमानाची नोंद झाली.

मुंबई तसेच पुणे परिसरावर ढगांची निर्मिती झाल्यामुळे सोमवारी अचानक मुसळधार पाऊस पडल्याचे हवामान विभागाने सांगितले. याचबरोबर संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

मोसमी वाऱ्यांची स्थिती

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आणखी काही भागात माघार घेतली आहे. मोसमी वाऱ्यांनी सोमवारी पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून माघार घेतली आहे. दरम्यान, मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण निर्माण झाले असून पुढील दोन दिवसांत मोसमी वारे राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि, उत्तर प्रदेश, पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या आणखी काही भागातून माघार घेतील असा अंदाज आहे.

Total Visitor Counter

2648402
Share This Article