पोलादपूर : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव हद्दीत रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी सदर घटना तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करून घटनास्थळाची पाहणी केली व तात्काळ दोन दिवसात दुरुस्ती करण्याबाबत सूचना दिली आहे.
यावेळी पळचिल ग्रुप ग्रामपंचायतिचे माजी सरपंच उमेश मोरे, रवींद्र जाधव, प्रवीण मोरे, ग्रामस्थ आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बोगदा मार्गे चौपदरीकरण काम करण्यात आले. यावेळी भोगाव गावचे हद्दीत डोंगरांचे उत्खनन करून डोंगर कापण्यात आले. नवीन महामार्ग बोगदा मार्गे वळवण्यात आला याच ठिकाणी जवळच भोगाव हद्दीत जुन्या मार्गावरील रस्त्याला पाच ते दहा मिटर अंतरावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने पावसाळ्यात येथील रस्ता खचून नवीन महामार्गावर दरड कोसळून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जुन्या महामार्गावर रस्त्याला भेगा पडलेल्या ठिकाणी खालील बाजूस जवळूनच नवीन महामार्ग गेला आहे त्यामुळे भेगा पडलेला रस्ता खचल्यास नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता असून संबंधित महामार्ग प्रशासनाकडून वेळीच दखल घेऊन तात्काळ उपाय योजना करणे गरजेचे बनले आहे अन्यथा या ठिकाणी मोठा अनर्थ घडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सद्यस्थितीत कशेडी घाटातील वाहतूक बोगदा मार्गे होत असल्याने जुन्या महामार्गावर तुरळक वाहतूक सुरू आहे यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा नसला तरी भविष्यात किंवा पावसाळ्यात बोगद्या मार्गे काही अनुचित प्रकार घडल्यास पर्यायी मार्ग म्हणून कशेडी घाटातील जुन्या महामार्गावरून वाहतूक वळवावी लागणार आहे यासाठी हा महामार्ग अतिशय महत्त्वाचा आहे यासाठी संबंधित बांधकाम विभाग प्रशासनाने वेळीच दखल घेऊन या ठिकाणी पडलेल्या भेगांबाबत वस्तूस्थिती जाणून घेऊन तात्काळ उपाययोजना करावी.
यासह सन 2005 च्या अतिवृष्टी मध्ये भोगाव हद्दीत खचलेला रस्ता हा सालाबाद प्रमाणे यंदाही सुमारे 90 ते 105 फूट लांब आणि दोन ते तीन फूट खोल खचलेल्या अवस्थेत असून अद्यापही संबंधित प्रशासनाकडून कासवाच्या गतीने या ठिकाणी काम सुरू असून त्यामुळे या विभागातून प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिक आणि प्रवासी जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे येथील रस्त्याची ही तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कशेडी घाटात जुन्या मार्गावर रस्त्याला भेगा : दरड कोसळून दुर्घटनेची शक्यता
