GRAMIN SEARCH BANNER

मुंबईपाठोपाठ आता कोकण मंडळाचीही सोडत, एप्रिलअखेरीस २००० घरांच्या सोडतीसाठी जाहिरात

Gramin Varta
207 Views

मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाने अंदाजे २५०० घरांच्या सोडतीची जाहिरात काढण्यासाठीच्या कामाला वेग दिला असतानाच आता कोकण मंडळही सोडतीच्या तयारीला लागले आहे. कोकण मंडळाने अंदाजे २००० घरांची सोडत काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

घरांची शोधाशोध आणि घरांच्या किंमती निश्चित करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण करून एप्रिलअखेरीस २००० घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन कोकण मंडळाचे आहे. जाहिरातीनंतर अर्जविक्री – स्वीकृती प्रक्रिया पूर्ण करून मे अखेरीस वा जूनच्या पहिल्या आठवड्यात सोडतीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

कोकण मंडळाने २०२५ मध्ये ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांसाठी सोडत काढली होती. या सोडतीसाठी दीड लाखांहून अधिक अर्ज सादर झाले होते. मात्र ७०० हून अधिक घरांना शून्य प्रतिसाद मिळाल्याने यावेळी केवळ ४,५३२ घरांसाठीच प्रत्यक्षात सोडत काढण्यात आली. तर सोडतीनंतर ४,५३२ विजेत्यांपैकी १,३०० हून अधिक विजेत्यांनी घरांना विविध कारणांनी नापसंती दर्शविली आणि घरे परत (सरेंडर) केली. या सोडतीतील उर्वरित विजेत्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून आता कोकण मंडळाने २०२६ च्या सोडतीची तयारी सुरू केली आहे.

यावर्षी सोडतीसाठी किती घरे उपलब्ध होतील याचा आढावा घेण्यात आला असून अंदाजे २००० घरांची सोडत काढता येणार आहे. त्यानुसार घरांची शोधाशोध सुरू असून लवकरच घरे निश्चित करण्यात येतील. त्यानंतर घरांच्या किंमती निश्चित करून सोडतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. साधारणतः एप्रिलअखेरपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली.

अल्प, अत्यल्प, मध्यम आणि उच्च अशा चारही उत्पन्न गटातील घरांचा या सोडतीत समावेश असणार आहे. उपलब्ध माहितीनुसार बाळकुम येथील म्हाडा गृहनिर्माणाअंतर्गत २२ मजली इमारत बांधण्यात आली असून यातील ३५० घरांचा समावेश सोडतीत केला जाणार आहे. ही घरे अत्यल्प आणि मध्यम गटासाठी असणार आहेत. तर चितळसर – मानपाड्यातील ५३१ घरांचाही सोडतीत समावेश असणार असून ही घरे अल्प आणि अत्यल्प गटासाठी असणार आहेत. त्याचवेळी २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत आठ प्रकल्पांतून कोकण मंडळाला १०० ते १५० घरे उपलब्ध होणार आहेत. तर उर्वरित घरे ‘विखुरलेली घरे’ योजनेतील असतील. त्यामुळे २०२६ मध्ये एकूण २००० घरांसाठी कोकण मंडळाकडून सोडत काढली जाणार आहे.

एप्रिलअखेरीस जाहिरात तर मे अखेरीस वा जूनच्या सुरुवातीला सोडतीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सोडतीतील घरांच्या किंमती नेमक्या किती असतील हे इच्छुकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे १५ ते २० दिवसांत घरांच्या किंमती निश्चित केल्या जाणार आहेत. किंमतीसाठी काहीशी प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी ठाणे, कल्याण, वसई-विरारमध्ये घर घेण्याची संधी इच्छुकांना पुन्हा एकदा कोकण मंडळाच्या सोडतीद्वारे उपलब्ध होणार आहे.

Total Visitor Counter

3366985
Share This Article