GRAMIN SEARCH BANNER

राजापूर प्रांत कार्यालयासमोरच गाडीच्या धडकेत बैलाचा मृत्यू; प्रशासनाचे आदेश कचर्‍यात, मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Gramin Varta
349 Views

राजापूर/ तुषार पाचलकर : मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस भयावह होत चालला आहे आणि त्याचाच थेट फटका आता निष्पाप जनावरांच्या जीवावर उठला आहे. काल सायंकाळी राजापूर प्रांत कार्यालयासमोरील पुलावर वाहनाने धडक दिल्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी हळहळ व्यक्त होत असताना, या प्रकरणाने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले आहे. अलीकडेच तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांनी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून गावस्तरावर समित्या स्थापन करण्याचे, पशुसंवर्धन विभागातर्फे गुरांचे शंभर टक्के टॅगिंग करण्याचे तसेच गुरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी मोकाट जनावरांवर नियंत्रणासाठी दिलेले आदेश प्रत्यक्षात जमिनीवर येतच नाहीत. आदेश कागदावर आणि फाइलमध्येच अडकून राहतात; प्रत्यक्ष अंमलबजावणी ‘केराच्या टोपलीत’ गेली आहे, असे जनतेतून सरळ आरोप होत आहेत.

गटविकास अधिकारी यांनी वेळोवेळी पाठवलेला पत्रव्यवहार, सूचना आणि आदेश  ग्रामपंचायत स्तरावर पोहोचायलाच तयार नाहीत. ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांना या विषयाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचत नाही, मोकाट गुरांच्या मालकांवर कोणतीही कारवाई होत नाही आणि त्याचा परिणाम निष्पाप जनावरांचे बळी. आणखी किती जीव जाणार? हा चटका देणारा सवाल सर्वत्र उपस्थित आहे.

ग्रामपंचायतीतील जबाबदार पदाधिकारी प्रशासनाच्या पत्रव्यवहाराकडे कानाडोळा करत असतील, तर त्यांना जाब विचारणार कोण? आणि गटविकास अधिकारी फक्त केबिनपुरते मर्यादित राहणार की प्रत्यक्ष कारवाई होणार? नागरिकांतून आता संताप उसळला आहे.

दरम्यान, काल झालेल्या बैलाच्या मृत्यू प्रकरणी पोलिस आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते उशिरा रात्री घटनास्थळी दाखल झाले व मृत बैलाची विल्हेवाट लावण्याची कारवाई पूर्ण केली. मात्र, हा प्रश्न विल्हेवाट लावून संपणारा नाही हा प्रशासकीय ढिसाळपणाचा आणि जबाबदारीशून्य कारभाराचा थेट निकाल आहे, असं नागरिकांचं म्हणणं.

मोकाट जनावरांनी रस्त्यावर मृत्यू ओढवून घेण्याची ही शेवटची घटना ठरणार का? की अजूनही प्रशासन फाइल पलटण्यापुरतंच उभं राहणार हा मोठा प्रश्न आता राजापूरवासीयांपुढे उभा ठाकलाय.

Total Visitor Counter

3206100
Share This Article