GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी तालुका संजय गांधी निराधार समितीची स्थापना; उक्षीचे मिलिंद खानविलकर यांची निवड

Gramin Varta
31 Views

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रत्नागिरी तालुका स्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. या नवनियुक्त समितीमध्ये सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील एकूण दहा प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला असून, उक्षी येथील विशेष कार्यकारी अधिकारी, माजी सरपंच, मिलिंद खानविलकर यांची सर्वसाधारण प्रवर्गातून अशासकीय प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.

या समितीची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. ही समिती योजनेसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांची निवड करेल. त्यामुळे निराधार व्यक्तींना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा मार्ग सुकर होणार आहे.

समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री यांनी शिफारस केलेले सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील मयेकर (कोतवडे) यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासोबत विविध प्रवर्गातून खालील सदस्यांची निवड करण्यात आली आहे:

  • मागासवर्गीय प्रतिनिधी: सुनील जाधव (वाटद)
  • महिला प्रतिनिधी: अपर्णा बोरकर (पानवल)
  • इतर मागासवर्गीय प्रतिनिधी: नामदेव चौघुले (गडनरळ, कोळीसरे)
  • इतर मागासवर्गीय प्रतिनिधी: रुपेश पेडणेकर (शिवाजीनगर, रत्नागिरी)
  • सर्वसाधारण प्रतिनिधी: मिलिंद खानविलकर (उक्षी)
  • अपंग प्रतिनिधी: श्रीकांत राऊत (पाली)
  • नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी: सुशांत पाटकर (दाभिळ अंबेरे, डोर्ले)
  • सामाजिक प्रतिनिधी: प्रतिक देसाई (जाकादेवी)
  • ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी: राजेश साळवी (मालगुंड)

या सर्व अशासकीय प्रतिनिधींसोबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (सदस्य) आणि नायब तहसीलदार (सदस्य सचिव) यांचाही समितीत समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील गरजू आणि निराधार व्यक्तींना लवकरात लवकर योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

खऱ्या आणि गरजू लोकांना या योजनेचा पुरेपूर लाभ मिळवून देण्यास मी प्रयत्न करेन आणि ज्या पात्र लोकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी माझ्याशी कधी ही संपर्क साधावा असे मिलिंद खानविलकर यांनी म्हटले आहे.

या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार उदय सामंत यांचे आभार मिलिंद खानविलकर यांनी मानले आहेत. मिलिंद खानविलकर यांचे उक्षी आणि रत्नागिरी परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Total Visitor Counter

3369517
Share This Article