GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा इशारा; फळबागांसह पशुधनाची काळजी घेण्याचे कृषी विद्यापीठाचे आवाहन

Gramin Varta
102 Views

दापोली (प्रतिनिधी): रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत आगामी काही दिवसांत उष्ण व दमट हवामानाची स्थिती निर्माण होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी आंबा, काजू आणि नारळ-सुपारी बागायतदारांसह पशुपालकांसाठी विशेष कृषी सल्ला जारी केला आहे. विशेषतः २७ मार्चपर्यंत कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता असून, त्यानंतर हवामान कोरडे राहण्याची चिन्हे आहेत. या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आंबा आणि काजू पिकावर होण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकऱ्यांनी बागांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

​आंबा पिकाबाबत सल्ला देताना विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, कडक उन्हामुळे फळांची होरपळ (सन स्कॉल्ड) आणि अकाली फळगळ होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी फळधारणा झालेल्या झाडांना दर १५ दिवसांनी १५० ते २०० लिटर पाणी द्यावे, मात्र काढणीच्या एक महिना आधी पाणी देणे बंद करावे. ज्या भागांत हापूस आंबा काढणीस तयार झाला आहे, तिथे ८० ते ८५ टक्के पक्वतेची फळे देठासह काढून सावलीत ठेवावीत. तसेच, फळांचे प्रखर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कागदी पिशव्यांचे आवरण घालणे फायदेशीर ठरेल. काजू बागेतही ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पेंढा किंवा सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे आणि नवीन लागवड केलेल्या कलमांच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावावी, जेणेकरून तीव्र उन्हामुळे खोडाची साल तडकणार नाही.

​फळबागांइतकीच खबरदारी भाजीपाला आणि पशुधनाच्या बाबतीतही घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वांगी, मिरची आणि टोमॅटो यांसारख्या पिकांना संध्याकाळी किंवा पहाटेच्या वेळी हलके पाणी द्यावे. पशुधनावर उष्णतेचा ताण येऊन दूध उत्पादनात घट होऊ शकते, त्यामुळे जनावरांना दिवसभर पुरेसे थंड पाणी उपलब्ध करून द्यावे आणि उष्माघातापासून वाचवण्यासाठी त्यांच्या चाऱ्यावर १ टक्के गूळ व अर्धा टक्के मिठाचे द्रावण शिंपडावे. कुक्कुटपालनामध्ये शेडचे तापमान कमी ठेवण्यासाठी छतावर गवत किंवा नारळाच्या झावळ्या टाकाव्यात आणि दुपारी तीव्र उन्हात पक्ष्यांना खाद्य न देता ते सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे. वाढत्या बाष्पीभवनामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन करावे, असेही या कृषी सल्ल्यात नमूद करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3375567
Share This Article