राजापूर : तालुक्यातील ओणी कोंडिवळे येथील प्रसिद्ध गगनगिरी आश्रमात श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अध्यात्मिक वातावरणात सहभाग नोंदवला.
स्वामी उल्हासगिरी महाराजांचा जन्मोत्सवही याच दिवशी अतिशय उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा झाला. यानिमित्ताने भजन, पूजन, नामस्मरण, प्रवचन, होम-हवन, भंडारा अशा धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना परमपूज्य उल्हासगिरी महाराजांनी गुरूचे महत्त्व विषद केले. “मानवाने तन-मन-धनाने गुरूंची सेवा करावी, त्यांनी दाखवलेल्या सन्मार्गाने चालावे,” असे आवाहन त्यांनी केले.
उत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरी येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले, ज्याचा अनेक भाविक व गरजूंनी लाभ घेतला.
गुरुपौर्णिमा उत्सव व महाराजांचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात, चोख व्यवस्थापनात पार पडला. ओणी आश्रमाचे सेवेकरी व स्थानिक भाविकांनी या आयोजनात मोलाचे योगदान दिले.
राजापूर ओणी येथील गगनगिरी आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी!
