रत्नागिरी : अचानक उद्भवणारे गंभीर आजार किंवा अपघात यामुळे कुटुंबावर वैद्यकीय खर्चाचा मोठा बोजा येतो. आर्थिक अडचणीमुळे अनेक रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळवणे कठीण होते. अशा गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या कक्षामार्फत आतापर्यंत २२ रुग्णांना तब्बल १७ लाख ३० हजार रुपयांची मदत मिळाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये, पहिल्या मजल्यावर २ मे २०२५ पासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालय कार्यान्वित झाले आहे. जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांसाठी हा कक्ष खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे.
गंभीर आजार अथवा अपघातग्रस्त कुटुंबांना मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय खर्च सहन करावा लागतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अशा रुग्णांना आर्थिक पाठबळ पुरवतो. आतापर्यंत या कक्षात ३३ गरजू रुग्णांनी मदतीसाठी अर्ज केले. त्यापैकी ३ अर्ज प्रलंबित, तर ७ अर्ज कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे नाकारण्यात आले आहेत.
सहाय्यता निधीच्या पारदर्शक वितरणासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती गरजूंना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. आतापर्यंत:
◼️१३ रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये
◼️८ रुग्णांना प्रत्येकी ५० हजार रुपये
◼️१ रुग्णाला ३० हजार रुपये
अशी आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून देण्यात आली आहे.
रत्नागिरी: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २२ रुग्णांना १७.३० लाखाची मदत
