GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये अपघातात जखमी झालेल्या अनोळखी प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

चिपळूण : तालुक्यातील वालोपे येथे काही दिवसांपूर्वी अपघातात जखमी झालेल्या एका अंदाजे ५०-६० वर्षांच्या अनोळखी पुरुषाचा रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. १६ ऑगस्ट रोजी दुपारी १.४५ वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी वालोपे येथे एक अनोळखी व्यक्ती अपघातात जखमी अवस्थेत आढळून आली होती. तिच्या उजव्या हाताला आणि कपाळाला दुखापत झाली होती. वालोपे येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी त्याच दिवशी रात्री १० वाजता १०८ रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

गेले काही दिवस तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद न दिल्याने १६ ऑगस्ट रोजी दुपारी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेची माहिती सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. रिद्धी करिआ यांनी पोलिसांना दिली.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Total Visitor Counter

2474942
Share This Article