राजापूर: राजापूर शहरातील दिवटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा गुजराळी येथे माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांच्या हस्ते आणि सामाजिक कार्यकर्ते अमृत तांबडे यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शाळेच्या आवारात स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात आली, ज्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले.
या कार्यक्रमाला गुजराळी शाळेच्या आवारात वाडीतील ज्येष्ठ आणि सामाजिक कार्यप्रमुख श्री. बाईत गुरुजी, न्यू हनुमान दिवटेवाडी मंडळाचे अध्यक्ष गिरीश वादक, केंद्रप्रमुख जायदे सर, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका विचारे मॅडम, शिक्षिका देसाई मॅडम, हातणकर मॅडम, शिंदे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रसंगी, माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांचे गुजराळी शाळेवरील लक्ष प्रशासकीय राजवटीतही कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. यापूर्वी त्यांनी शाळेच्या छताची दुरुस्ती तसेच शाळेसमोरील मैदान तयार करण्याची कामे वेळप्रसंगी स्वखर्चाने करून शाळेच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि समाजकार्याची नोंद स्थानिक नागरिक व प्रशासकीय वर्तुळात घेतली जात आहे. या वृक्षारोपणामुळे शाळेचे परिसर हिरवागार होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.