टेम्पो चालकावर गुन्हा दाखल
संगमेश्वर: तालुक्यातील कारभाटले घोरपडेवाडी येथे सोमवारी संध्याकाळी एसटी बस आणि महिंद्रा सुप्रो गाडीत समोरासमोर धडक झाली. या अपघातात सुप्रो गाडीचा चालक जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४.३५ च्या सुमारास घडला. फिर्यादी अप्पासो कल्लाप्पा कोळी (वय ३५), हे एमएच-४०/एन-९७०९ क्रमांकाची एसटी बस घेऊन संगमेश्वरहून कातुर्डीच्या दिशेने जात होते. कारभाटले घोरपडेवाडी येथे रस्ता अरुंद असताना, समोरून येणाऱ्या एमएच-०८/एपी-३३८५ क्रमांकाच्या महिंद्रा सुप्रो गाडीने एसटी बसला जोरदार धडक दिली.
हा अपघात सुप्रो गाडी चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. सुप्रोचा चालक यश सतीश विभुते (वय २५, रा. कळंबस्ते) याने अरुंद रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता गाडी भरधाव वेगाने चालवली, ज्यामुळे हा अपघात घडला. धडकेत यश विभते किरकोळ जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी एसटी चालक अप्पासो कोळी यांच्या फिर्यादीनुसार संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.