संगमेश्वर : तालुक्यातील १३४ रास्त भाव धान्य दुकानदारांचे सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे कमिशन गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असून, त्यामुळे हे दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाच्या धोरणात्मक गोंधळामुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
घरखर्च, कर्मचारी वेतन, भाडे आणि अन्य दैनंदिन खर्च भागवणे अशक्य झाले असून, दुकानदार हवालदिल झाले आहेत. यामध्ये अनेक सहकारी संस्था आणि महिला बचत गटांचा समावेश असून, हे सर्व जण सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग म्हणून काम करत आहेत.
दुकानदार संघटनांनी वारंवार निवेदने, भेटी आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून फक्त आश्वासनेच मिळत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्या गेल्या, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
संघटनेचा संतप्त सवाल : उदरनिर्वाह कसा करायचा?
रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. सरकारी यंत्रणांकडून आम्हाला न्याय मिळणार का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
संघटनेने शासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली असून, या थकीत कमिशनचा तात्काळ निधी वितरीत न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांचे एक कोटींचे कमिशन थकीत; सहा महिन्यांपासून हवालदिल
