GRAMIN SEARCH BANNER

देवरुख शहराचा नियोजनबद्ध विकास मागील दहा वर्षांत झाला नाही ही वस्तुस्थिती- सौ.अनघा कांगणे

Gramin Varta
420 Views

देवरुख: केवळ रस्ते, गटारे होणे आणि ते लवकर खराब होणे म्हणजे शहर विकास नव्हे, त्या पलीकडे शहराचा विकास व्हायला हवा.शहर विकास हा पुढील पंचवीस वर्षांचा विचार करून नियोजित पद्धतीने झाला पाहिजे. मात्र, मागील दहा वर्षांत देवरुख शहराचा नियोजनबद्ध विकास दिलासादायक नसल्याचे मत ‘गाव विकास समिती’च्या देवरुख शहर अध्यक्षा सौ. अनघा कांगणे यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी शहरातील विविध समस्यांवर बोट ठेवत नगरपंचायतीच्या कारभारावर टीका केली आहे.

सौ. अनघा कांगणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार, मागील दहा वर्षांत देवरुख शहर आणि आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांचा सर्वांगीण विकास झाला नाही. आज देवरुख नगरपंचायत हद्दीतील रस्त्यांची चाळण झाली आहे असेही कांगणे म्हणाल्या.नगरपंचायतीने नागरिकांसाठी ज्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे, त्या शहरात दिसून येत नाहीत.

प्रमुख समस्या आणि ‘गाव विकास समिती’च्या अनघा कांगणे यांचे आक्षेप:

नियोजन आणि धोरणांचा अभाव: शहरात सध्या कोणतेही स्पष्ट ‘पार्किंग धोरण’ नाही. तसेच, ‘शहर विकास आराखडा’ आणि ‘ड्रेनेज धोरण’ यांबाबत नगरपंचायतीने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.

रस्ते सुधारणेत भविष्याचा विचार नाही: शहरात अपुऱ्या जागांमुळे रस्ते सुधारणा करताना भविष्याचा विचार केला जात नाही, त्यामुळे रस्ते लवकर खराब होत आहेत.

प्रशासकाकडून दखल नाही: मागील दोन वर्षांपासून शहरात प्रशासक असूनही, शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अपूर्ण नगरपंचायत इमारत: देवरुख नगरपंचायतीची नवीन इमारत मागील पाच वर्षांत पूर्ण होऊ शकलेली नाही.

केवळ रस्ते, तोही तात्पुरता विकास: शहरात कोणताही विशेष बदल दिसत नाही. जे रस्ते झाले, ते पाच वर्षांच्या आतच खराब झाले आहेत. त्यामुळे नेमका कोणता बदल झाला, असा थेट सवाल सौ. अनघा कांगणे यांनी प्रशासनाला विचारला आहे.

शहराचा विकास केवळ रस्त्यांपुरता मर्यादित न ठेवता, तो सर्वांगीण आणि दूरदृष्टीचा असावा, अशी मागणी गाव विकास समितीच्या माध्यमातून अनघा कांगणे यांनी केली आहे.

Total Visitor Counter

3378809
Share This Article